Tuesday, December 9, 2025

टीईटी परीक्षा संदर्भाने

      




    " गुरुविन न मिळे ज्ञान,

            ज्ञानाशिवाय न मिळे जगी सन्मान "

" जे मुलांना शिकवतात ते शिक्षक असतात

 जे मुलांना घडवतात ते शिक्षक असतात 

 जे मुलांचे भविष्य सावरतात ते शिक्षक असतात

 जे पंखात बळ देतात ते शिक्षक असतात "

 शिक्षक बांधवांनो,

          नोकरी काही आपल्याला वारसा हक्काने मिळालेली प्रॉपर्टी नाही. तर अति कठीण परिस्थितीमध्ये दिवस-रात्र एक करून मिळवलेली पात्रता आहे. आपण पात्र आहोत म्हणून आपल्याला नोकरी दिलेली आहे. पुन्हा नव्याने यांची टीईटी परीक्षा देऊन पात्रता दाखवण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा मला कुसुमाग्रजांची " फक्त लढ म्हणा " ही कविता आठवते. जे की जगायला, जिंकायला आणि पडल्यानंतरही पुन्हा उभा राहायला शिकवते. त्याप्रमाणेच पाच डिसेंबर रोजी चा मोर्चा आपल्याला जोपर्यंत आपण जिंकत नाहीत तोपर्यंत एकजुटीने पुढे घेऊन जायचा आहे.

        " शिक्षकांशिवाय शिक्षणाची क्रांती घडू शकत नाही. त्यांना माहित पाहिजे की, आपण क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे आदर्श शिक्षक आहोत. तेव्हाच्या कठीण परिस्थितीमध्ये फुले दाम्पत्यांनी हाल अपेष्टा सहन करून शिक्षणाची एवढी मोठी क्रांती घडवली. त्यावेळी ते दोघे होते पण आता आपण असंख्य आहोत. त्याकाळी फुले दांपत्याने फक्त शिकवण्याचे काम केले म्हणून शिक्षणाची एवढी मोठी क्रांती घडून आली पण आत्ताचे सत्ताधारी आपल्याला इतर अनेक कामांमध्ये गुंतवून ठेवून, ऑनलाइन ची कामे, अशैक्षणिक कामे, अनावश्यक उपक्रमांचा बोजा शिक्षकावर लादून त्यांना शिकवण्यासाठी वेळ अपुरा पाडतोय. आमची एकच मागणी आहे, " आम्हाला फक्त शिकवू द्या, मुलांमध्ये विविध मूल्ये रुजवण्यासाठी वेळ द्या आणि जर असे झाले तर आपण सर्वजण भारत महासत्ता होण्याचे जे स्वप्न पाहतोय ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही ".

         पूर्वी शाळेत चौथी किंवा सातवी पास असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायला होते. त्यांनी नाही का देशाला राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, डॉक्टर, इंजिनीयर, वकील असे विविध क्षेत्रात कार्य करणारे विद्यार्थी देशाला दिले आणि आता तर आम्ही पात्र असलेले शिक्षक आहोत, आमचे विद्यार्थी तर विदेशात जाऊन विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. पण जे आमच्याकडे बोट दाखवत आहेत, आमच्या पगारावर बोलत आहेत त्यांना कळाले पाहिजे की आम्ही शिक्षक त्यांच्यासारखे वारसा हक्काने खुर्चीवर बसलेलो नाहीत, तर पात्रता असल्यामुळे शासनाने आमची नेमणूक केली आहे. आता टीईटी परीक्षा आमच्यावर लादून नव्याने पुन्हा आमची पात्रता बघण्याचा कुणालाही हक्क नाही. म्हणून म्हणते आम्हाला आमचं काम करू द्या.

                         " आम्हाला फक्त शिकवू द्या,

                             आम्हाला फक्त शिकवू द्या".

 श्रीमती नंदा निवृत्ती सोनकांबळे 

जि. प. प्रा. शा. काशीराम तांडा 

ता. उदगीर जि. लातूर मो. नं 7038219211 


 

               


Wednesday, April 17, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील स्त्रियांची प्रगती


विश्वज्ञानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महापुरुष होते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हवी होती. भारत देशातील प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळालाच पाहिजे आणि तो सन्मानाने जगला पाहिजे यासाठी त्यांनी 1927 ते 1956 या कालखंडात मानवतेचा लढा सुरू ठेवला या लढ्याचा अविभाज्य घटक म्हणजेच" स्त्रीमुक्ती "लढा होय.

               अन्नाप्रमाणेच विद्या सर्वांनाच आवश्यक आहे असा विचार इ.स. पूर्व पाचव्या- सहाव्या शतकात भगवान बुद्धांनी याच भारत देशात मांडला होता. तर कंपनी सरकारने 1813 साली नवी सनद काढून शिक्षणाची दारे सर्वांना खुली केली होती. परंतु येथील चातुर्वणर्य  व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमतेवर आधारित समाज रचनेत एका विशिष्ट समाजाला आणि समस्त स्त्री वर्गाला शूद्र समजून वेदाध्ययनाचा अधिकार नाकारला होता. परंतु महात्मा फुलेंनी स्त्रीला पती,मुलेबाळे,चूल आणि मूल या पलीकडचे जग कळले पाहिजे या विचारातून अस्पृश्य मुलींची शाळा काढून समस्त स्त्री वर्गाच्या शिक्षणाला प्रारंभ केला.

                 यापुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटले की, वैयक्तिक जीवन तत्त्वज्ञानाचा विचार केला तर शिक्षण हे स्त्रीच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री मुक्तीचे पक्के समर्थक होते कारण त्यांच्यावर भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचा आणि क्रांतीज्योती महात्मा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातून, ग्रंथातून,पत्रातून स्त्रियांच्या विकासाला महत्त्व दिल्याचे दिसते. ते म्हणतात कोणत्याही देशाची किंवा समाजाची प्रगती ही त्या देशातील किंवा समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजता येईल म्हणजे ज्या समाजात स्त्रिया पुढे त्या समाजाची प्रगती पुढे ज्या देशातील स्त्रियांची प्रगती झाली त्या देशाची प्रगती झाली असे म्हणता येईल.

                बाबासाहेबांना वाटायचं की जर स्त्रिया मागासलेल्या असतील, मागे असतील,शिकलेल्या नसतील, जीवनातील अनेक महत्त्वाच्या पदावर नसतील तर तो समाज आणि तो देश प्रगती पासून दूर असेल. पुरुषांबरोबर स्त्रियांनाही आपले हक्क आवडी- निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. म्हणजेच लग्नानंतर स्त्री ही नवऱ्याची गुलाम न बनता तिला नवऱ्याची मैत्रीण आणि समान अधिकार असणारी सहचारिणी बनता आले पाहिजे याविषयी बाबासाहेबांनी केलेल्या 1942 च्या भाषणात ते म्हणतात - "above all let is girl who marrige stand up to husband claim to be her husband friend and equal and refuse to be selve "

                 आज आपण मुलींना कुटुंबात आणि समाजात दुय्यम स्थान दिल्याचे पाहतो शिक्षण देतानाही मुलांना पूर्ण शिक्षण होईपर्यंत शिकवले जाते पण मुलींच्या बाबतीत तसे दिसून येत नाही म्हणून शाळेत मुलींच्या गळतीचे प्रमाण जास्त दिसून येते.पण दहावी बारावी किंवा स्पर्धा परीक्षेचा निकाल असेल त्यात मात्र मुलींच्या प्रगतीचा आलेख उंचावलेला दिसतो. डॉ.बाबासाहेब सांगतात आपला देश जर महासत्ता बनवायचा असेल तर ते आपल्याच हातात आहे स्त्री पुरुष समान हक्क आणि मुला-मुलींना समान शिक्षण दिले पाहिजे तेव्हा आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची प्रगती होईल आणि आपला देश महासत्ता बनेल  

                  स्त्रियांच्या प्रगतीसाठी, प्रतिष्ठेसाठी, तिला सन्मानाने जगता यावे म्हणून त्या त्या काळात अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केलेले दिसून येतात.त्यात महत्त्वाचे म्हणजे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून दिली. आणि याच दारातून अनेक महिला शिकून महत्त्वाच्या पदावर विद्यमान झाल्या. पण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कांना आणि अधिकारांना घटनेच्या माध्यमातून कायदेशीर रित्या संरक्षण मिळवून दिले म्हणूनच आज आपण पाहतो की, मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या आदिवासी समाजातील स्त्री राष्ट्रपती पदावर विद्यमान आहे आणि म्हणून आता कुठे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील स्त्री आपल्याला पाहायला मिळते आहे.यात शंका नाही.

                     आज 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 साव्या जयंती निमित्त सर्व समाज सुधारकांना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून समस्त स्त्री वर्गाला आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देते.

           सहशिक्षिका 

श्रीम. सोनकांबळे नंदा निवृत्ती 

जि प प्रा शा वाकसा 

ता. निलंगा जि. लातूर 

मो. नं.7038219211


Sunday, April 11, 2021

महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्रियांचे शिक्षण




शिक्षणाचे आग्रही, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, " स्त्रियांचे शिक्षण "हे ब्रीद घेऊन समाजाच्या विरुद्ध प्रवाहाने ध्येय गाठणारे, अठराव्या शतकात स्त्रियांना आणि दीनदलितांना शिक्षणाचा आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून कार्य करणारे आणि जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक गुरु म्हणून ओळखले जाणारे ज्ञानज्योती, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

              महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारातच आपल्याला असे दिसून येते की, पुरूषांच्या बरोबरीने स्त्री आल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही जसे  नाण्याची एक बाजू कोरी असेल तर ते नाणं उपयोगात येत नाही, गाडीच्या दोन चाका पैकी  एक चाक मोडून पडला तर गाडी पुढे जात नाही. त्याप्रमाणे स्त्री-पुरुष हे जीवनाचे दोन्ही अंग सक्षम असली पाहिजेत आणि त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. म्हणजेच पुरुषाच्या बरोबरीने स्त्री सुद्धा प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभागी झाली पाहिजे. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सर्वच लेखनामध्ये आपल्याला स्त्री-पुरुष अशीच मांडणी दिसून येते.

              प्रवाहात तर काहीही  वाहून जाते,पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहून समाजाला अज्ञानाच्या अंधकारात तून आणि गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षण रुपी अमृत पाजून सक्षम बनविले. आपण समाजाला अज्ञानाच्या अंधकारा तून बाहेर काढण्याचा विचार सोडून द्या हो, फक्त आपल्या कुटुंबाला जरी अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढलं तर आपल्यावर गुलामगिरी राज्य करू शकणार नाही.

             आज प्रत्येक घरातील पुरुष कोणत्या ना कोणत्या नोकरीला आहेत. जेव्हा ते कार्यक्रमात बोलत असतात ,तेव्हा ते  बोलताना ज्ञानज्योती, क्रांतीसुर्य, समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना त्रिवार अभिवादन असे मोठ्या उत्साहाने म्हणतात,  पण हाच उत्साह घरात वावरताना ठेवला तर काय बिघडेल? आत्ताची पिढी सुशिक्षित म्हणण्यापेक्षा प्रगत आहे. ती आपल्या मुलांना हवे तसे संस्कार व शिक्षण देऊ शकते. जर प्रत्येक वडील मुलीच्या पाठीशी शिक्षण देण्यासाठी, प्रत्येक नवरा पत्नीच्या पाठीशी शिक्षणाची सावित्री बनवण्यासाठी, प्रत्येक भाऊ बहिणी सोबत  जर खंबीरपणे उभे राहिले तर प्रत्येक  मुलगी, पत्नी, बहिण स्वावलंबी आणि सक्षम बनेल. जेव्हा मुलगी काही करू इच्छिते तेव्हा वडील तिचे लग्न लावून देतात आणि मग पुढे मुलीच्या वाट्याला जे येते ते खूपच असहय करणारे असते.म्हणून प्रत्येक पित्याने आपल्या मुलीला ती स्वावलंबी होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. तरच आजच्या या महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिनी तुम्ही केलेल्या त्रिवार अभिवादनाचे खरे सुख मिळेल.

        



        ज्यांनी पुरुषांसाठी वेगळे नियम आणि स्त्रियांसाठी वेगळे नियम लावून दिले या नियमामुळे खरेतर भेदभावाची भावना कुटुंबातूनच उदयास आली.म्हणून या नियमांना महात्मा ज्योतिबा फुले यांचा तीव्र विरोध होता. आताही आपण मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करतो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारात आपल्याला असे दिसून येते की, सर्व प्राण्यांमध्ये पुरुष श्रेष्ठ आहे तसेच सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. हेही आपल्याला विसरून चालणार नाही.

                  महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत जेव्हा मुलींची पहिली परीक्षा झाली त्या वेळचे हे उदाहरण - फुले दांपत्याच्या शाळेत जेव्हा मुलींची पहिली परीक्षा झाली, तेव्हा ती परीक्षा पाहण्यासाठी तिथे तीन हजारापेक्षा जास्त लोक जमले होते.  मुलींची परीक्षा म्हटलं की जास्त कुतूहल वाटतं का हो? बरे असो. त्या परीक्षेत एक मुलगी पहिली आली. तिला कलेक्टर च्या पत्नीच्या हस्ते एक बक्षीस देण्यात आलं. तेव्हा त्या मुलीने प्रश्न विचारला की,तुम्ही मला यात काय बक्षीस दिलं आहे. तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या,  तू लहान आहेस तुला खेळणी आणि खाऊ आवडतो म्हणून आम्ही तुला यात खेळणी आणि खाऊ दिला आहे. तेव्हा त्या मुलीने दिलेलं उत्तर असं होतं मला खाऊ आणि खेळणी नको मला माझ्या शाळेत ग्रंथालय पाहिजे.  म्हणजेच शिक्षण आपल्याला किती सक्षम बनवतं याचंच हे उत्तम उदाहरण.

         



       आणखी एक उदाहरण मी आपल्या  समोर ठेवू इच्छिते. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींचे .  ती विद्यार्थिनी आहे ताराबाई शिंदे.  ताराबाई शिंदे यांनी  " स्त्री पुरुष तुलना " हा मराठी ग्रंथ 1885 मध्ये लिहिला, तो जगातला सर्वात पहिला स्त्री हक्क व स्त्रीवाद यावर चा ग्रंथ मानला जातो. त्याच बरोबर 1906 साली तानुबाई बिर्जे नावाची विद्यार्थिनी भारतातील पहिली महिला संपादिका झाली.  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणारी विद्यार्थिनी सावित्रीबाई रोडे ही 1915   साली पहिली महिला सरचिटणीस झाली. हे सगळं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्यामुळे शक्य झालं म्हणून स्त्रियांसाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी आहेत.

                    स्त्रियांना शिक्षण रुपी अमृत पाजून,  स्त्रियांच्या जीवनात अनंत पैलू आणणारे महान क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्व महिलांच्या वतीने कोटी कोटी अभिवादन.

 सहशिक्षिका

श्रीमती सोनकांबळे नंदा निवृत्ती

जि प प्रा शा मुत्तलगाव

ता. उदगीर जि. लातूर 

Sunday, March 7, 2021

स्त्रियांच्या प्रश्नावर बोलू काही




जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम क्लारा झेटकिन या कार्यकर्तीला मानाचा सलाम करून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. 8 मार्च रोजी दरवर्षी मोठ्या उत्साहात आपण महिला दिन साजरा करतो. आपल्या आयुष्यात भेटलेल्या सर्व महिलांना आपण शुभेच्छा देतो. कर्तृत्ववान महिलां विषयी आदर व्यक्त करतो. या दिवसाचा मुख्य हेतु म्हणजे महिलांना त्यांच्या हक्क व अधिकाराविषयी जाणीव करून देणे, यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.विविध पुरस्काराने महिलांना सन्मानित केले जाते. पण खरच वर्षातील 8 मार्च हा दिवस सोडला तर बाकीचे 364 दिवस आपण त्याच पद्धतीने महिलांसोबत आदराने वागतो का? आपल्यातील 90% महिलांना तर आजचा दिवस काय असतो याची जराशी ही खबर  नसते.अशा महिलांना या दिवशी त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली तर या दिवसाचे उद्दिष्ट साध्य होईल नाहीतर महिला दिवस हा कार्यक्रमा पुरताच  मर्यादित राहील.

             महिला पुरस्काराच्या विविध बातम्या प्रसारित होताना आपण पाहतो. मोठमोठे बॅनर जाहिराती पोस्टर्स इत्यादीवर बराचसा खर्च झालेला  दिसतो. हे सर्व पाहून त्या दिवसापुरता आनंद तरी होतो पण त्यानंतरच्या 364 दिवसाचं काय? हा प्रश्न भयानक रूप धारण करताना दिसतो. आजची महिला जेव्हा कामानिमित्त घरातून बाहेर पडते तेव्हा ती सुरक्षित आहे का?आज सुद्धा जेव्हा  ती  कामावरून उशिरा घरी येते तेव्हा तिच्या मनात एक प्रकारची भीती असते. असे का?

              कोविड -19  मुळे रस्त्यावर जागोजागी मास्क लावला नाही म्हणून दंड लावणारे कर्मचारी आपल्याला दिसतात, पण आजची महिला कामावरून उशिरा घरी येताना ती सुरक्षित घरी यावी म्हणून कुणीही तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर कुठेही थांबलेला दिसत नाही.उलट सगळेजण तिची छेड काढण्यासाठी टपलेले असतात. कोविड -19 मुळे झालेले मृत्यू तुम्हाला दिसतात, पण अन्याय,अत्याचार, ॲसिड हल्ला, बलात्कारामुळे आपले जीवन संपवणाऱ्या स्त्रियांचे मृत्यू तुम्हाला दिसत नाहीत का? कोविड -19 चा व्हायरस तुम्हाला दिसतो, पण अन्याय, अत्याचार करणारे व्हायरस तुमच्या समोरून बिनधास्त फिरताना दिसतात. त्यांच्यावर कोणती व्हॅक्सीन कोण आणि कधी शोध लावून कंपल्सरी देण्याची व्यवस्था करणार आहे,याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत आणि तेव्हा कुठे या 8 मार्च महिला दिनाच्या गौरवाचा खरा आनंद मिळेल हाच मोठा पुरस्कार महिलांसाठी असेल.




               खरे तर व्हॅक्सिन हवंच कशाला? मानसिकता बदलण्यासाठी काय व्हॅक्सीन लागतो होय. महिलांना महिला दिना दिवशीच आदराने  वागणूक देण्यापेक्षा 365 दिवस ही तिच्याशी आदराने वागले तर व्हॅक्सीन ची गरजच काय? मुलीचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत ती संघर्षमय जीवन जगून कितीतरी नाते निभावते. प्रत्येक टप्प्यावर ती आपले कर्तत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याला अनेक कर्तुत्ववान स्त्रियांचा इतिहास माहित आहे. चूल आणि मूल सांभाळून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या स्त्रिया आपण पाहतो. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेली दिसून येते. ती कुठेही मागे नाही,पण ती अजूनही सुरक्षित नाही. हाच खूप गंभीर प्रश्न आहे.

                स्त्री शक्तीला व स्त्रियांना समजून घेत असताना भारतीय परंपरेत स्त्री व पुरुष यांना एकच दर्जा दिलेला दिसतो.म्हणजेच दिव्यात तेल आहे पण वात नाही किंवा वात आहे पण तेल नाही, म्हणजेच पडणाऱ्या प्रकाशात तेल आणि वात दोन्हीचा दर्जा एकच आहे. म्हणून म्हणते जागतिक महिला दिनाचे खरे सार्थक तेव्हाच होईल,जेव्हा प्रत्येक पुरुष स्त्री चे महत्व ओळखून तिचा अधिकार मनापासून स्वीकारेल.तेव्हा कुठे स्त्रीला सुरक्षिततेची दिशा मिळेल.




                 क्लारा ने 8 मार्च 1908 साली वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या स्त्रियांना घेऊन न्यूयॉर्कमध्ये निदर्शने केली होती, तेव्हा ही  क्लारा ने  कामाचे तास कमी आणि "महिला सुरक्षितता," पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही मतदानाचा हक्क,मालमत्ता इत्यादी बाबींची मागणी केली होती.त्या दिवसाला स्मरून तिने 8  मार्च हा दिवस "जागतिक महिला दिवस" म्हणून साजरा करावा, अशी ही मागणी केली होती आणि ती मान्यही झाली. आपल्याला आजपर्यंत क्लारा च्या इतर मागण्या मान्य झालेल्या दिसून येतात. पण आजही "महिला सुरक्षितता "ही मागणी अपूर्ण असल्याचे चित्र दिसून येते या मागणीची पूर्तता जेंव्हा होईल, तेव्हाच महिला दिनाचे सार्थक होईल, असे वाटते. आजही महिला दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आतापर्यंत यशस्वी झालेला नाही, कारण समाजाची मानसिकता आजही बदललेली दिसून येत नाही.

             8 मार्च हा दिवस जसा आपण आनंदाने साजरा करतो तोच आनंद 364 दिवस सर्व स्त्रियांना मिळो.   अशी अपेक्षा  व्यक्त करून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते.

 धन्यवाद.

 सहशिक्षिका

 नंदा सोनकांबळे

जि प प्रा शा मुत्तलगाव 

ता. उदगीर जि. लातूर   


Monday, January 18, 2021

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अहवाल लेखन






 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लातूर,वर्धा व बुलढाणा,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तसेच मा. ना. प्रा.वर्षाताई गायकवाड मा. मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने" नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020" दिनांक 18 जानेवारी ते 22 जानेवारी 2021 पाच दिवशीय वेबिनार सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे.आज दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी या वेबिनार ची सुरुवात लातूर डाएटच्या  डॉ. भागीरथी गिरी मॅडम यांच्या प्रास्ताविकेने झाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याचा उद्देश सांगताना त्या म्हणाल्या की ज्या ज्या नवीन गोष्टी शासनाकडून येतात त्या आम्हाला हव्या असतात. भारत हा विकसनशील देश आहे. त्याला सुपर पावर जर बनवायचा असेल तर एक ऐतिहासिक निर्णय या धोरणात मांडलेला आहे आणि शिक्षण प्रक्रियेत एक नवी दिशा यातून मिळणार आहे. एकविसाव्या शतकातील हे पहिल धोरण जरी असले तरी यापूर्वी 1968,1986,1992 आणि यात सुधारणा करून 2020 च नवीन शैक्षणिक धोरण तयार केलं आहे.  एकविसाव्या शतकातील यात कोणता बदल केलेला आहे याची माहिती या पाच दिवसीय वेबिनार मध्ये आपल्याला मिळणार आहे.  " राष्ट्रातील भवितव्य शाळेच्या वर्गा वर्गातून घडत आहे" कोठारी आयोगातील या वाक्याची त्यांनी आठवण करून दिली.  त्याच बरोबर "नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला केंद्रस्थानी मानून अशा शिक्षण प्रणालीची कल्पना करते की, ती सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करून आपल्या राष्ट्राला सातत्याने न्याय व चैतन्यमय समाजात परावर्तित करण्यात योगदान देते" म्हणजेच आपला भारत देश विकसनशील देश बनवायचा असेल तर मी माझ्या मुलांना कशा पद्धतीने घडवणार आहे याची माहिती, या पाच दिवसीय वेबिनार मध्ये आपण शिकणार आहोत.  हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. यानंतर बुलढाणा डायट चे प्रिन्सिपल विजय कुमार शिंदे सर व वर्धा डायटचे  प्रिन्सिपल डॉ. मंगेश घोगरे सर  यांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयी प्रास्ताविक मांडले.

                 आजच्या वेबिनार च्या मुख्य मार्गदर्शिका डॉ.नेहा बेलसरे मॅडम(MIEPA) यांचा एक आगळा वेगळा परिचय डॉ.भागीरथी गिरी मॅडमनी करून दिला. त्या म्हणाल्या की एखाद्या व्यक्तीचा परिचय काय द्यावा म्हणण्यापेक्षा किती द्यावा अशा या नेहा बेलसरे मॅडम आपल्या महाराष्ट्राच्या भूषण आहेत.

                 नवीन शैक्षणिक धोरण 2020 याविषयी बोलताना डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम म्हणाल्या की, " राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 "हे प्रभावीपणे राबवून प्रत्येक घटकापर्यंत प्रभावी माध्यमातून पोचवले तर येत्या वीस वर्षात भारतातील शिक्षण पद्धती मुळातून बदलेल आणि भारत एक जागतिक ज्ञानसत्ता होईल. हे साध्य होण्यासाठी सर्वांनी हातभार लावून त्यात सक्रीय सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी प्रत्येक मानवी घटका समोर ठेवलं आहे.  हे करत असताना प्रत्येक मानवी घटकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 समजून घेणे आणि त्याची मांडणी करणं गरजेचं आहे.हे धोरण निर्मिती करण्यामध्ये याचे अध्यक्ष हिसरोचे के. कस्तुरीरंगन आणि त्यांची अकरा जणांची टीम यांनी येत्या वीस वर्षात भारत कसा असला पाहिजे आणि कसा दिसला पाहिजे हा भविष्यवेधी दृष्टिकोन ठेवून हे धोरण त्यांनी विकसन  केले आहे.  समाजातील सर्व समस्या शिक्षणाने शोधण्याचे कार्य आणि या धो रणातील शिक्षण प्रक्रिया हे भारतीय मूल्यावर आधारीत असेल आणि येणारी पिढी सक्षम होईल.नवीन शैक्षणिक धोरण हे अतिशय प्रागतिक, व्यापक आणि भविष्यवेधी आहे यामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्याचा विचार केलेला आहे.  सद्यस्थितीत शिक्षणात काही समस्या वर त्यांनी चर्चा केली यात घोकंपट्टीवर भर, गुण म्हणजे गुणवत्ता हा गैरसमज हे कुठेतरी बदलला  पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पाच मूलभूत स्तंभावर आधारित असून त्यात -

1) प्रवेश

2) समता

3) गुणवत्ता

4) परवडणारे

5) उत्तरदायित्व या पाच महत्त्वाच्या मुद्यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यानंतर प्रचलित शैक्षणिक रचना आणि नवीन शैक्षणिक रचना व यातील स्तर  यावरही चर्चा केली. 64 कला आणि 14 विद्या याचाही उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे  नाव बदलून" शिक्षण मंत्रालय" ठेवणे बाबतचा निर्णय ही त्यांनी सांगितला.  ज्ञान भाषा व माध्यम भाषा यावर ही सखोल मार्गदर्शन केले. पाचवीपर्यंत मातृभाषा हेच माध्यम असावं, आणि सहावीपासून व्यावसायिक व कृती शिक्षण रोजगारावर भर,कला-क्रीडा,योग शिक्षण द्यावे.  नववी ते बारावी या चार वर्षात 40 विषयाचा अभ्यास करण्याची संधी या धोरणाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.यामध्ये 24 विषयाची परीक्षा सत्र पद्धतीने होईल आणि 16 विषयाचे मूल्यांकन शाळास्तरावर होणार आहे असे त्यांनी सांगितले. (Nios) आणि राज्यातील मुक्त शाळा द्वारे तिसऱ्या, पाचव्या आठव्या इयत्ता साठी खुले शिक्षण आणि प्रज्ञावंताचे  शिक्षण यावरही त्यांनी विचार व्यक्त केले. प्रत्येक बालका पर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोचवणे हा शाळा समूहाचा मूळ उद्देश ही  त्यांनी सांगितला. तंत्रज्ञान व ऑनलाइन शिक्षण 2020 नवीन शैक्षणिक धोरण आले आणि आता 2040 पर्यंत जगामध्ये कुठलीही शिक्षण पद्धतीही भारत देशा पेक्षा पुढचे असणार नाही त्याच बरोबर आपण जागतिकीकरणा कडे जाताना भारतीय मूल्यं, संस्कृती इत्यादी सोबत घेऊन  शिक्षण देणार आहोत त्याच बरोबर पुस्तकाच्या उपलब्धतेबाबत तसेच डिजिटल ग्रंथालय आणि संस्थांचे धोरण  यावरही त्यांनी चर्चा केली.

              अभ्यासक्रम कमी करणे म्हणजेच कौशल्य आधारितशिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि घोकंपट्टी आधारित शिक्षण कमी करण्यासाठी सन 2020 पर्यंत अभ्यासक्रमात व अध्यापन शास्त्रात बदल करणे तसेच शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा( NcF)व शिक्षक प्रशिक्षणाबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सन 2021 पर्यंत तयार करणे, या धोरणातून आपण आत्मनिर्भर शिक्षणाचे स्वप्न बघत आहोत असेही त्या म्हणाल्या. केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकसित करण्यावर भर म्हणजेच मूल्यांकन पद्धतीत बदल आणि अध्ययन निष्पत्ती च्या आधारित मुलांचे शिकणे तपासले जाणार आहे. केवळ गुण न नोंदवता क्षमता, कौशल्य विकास,प्रगती पुस्तक,  स्थिती  नोंदवून सर्वांगीण विकासाला चालना दिली जावी. म्हणजेच वैविध्यपूर्ण पद्धती ने मूल्यांकन केले जाणार आहे.

                नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र विषयी बोलत असताना त्यांनी

1) अनुभवात्मक अध्ययन

2) एकात्मिक अध्यापन शास्त्र

3) समवयस्क कातिल अभ्यासास प्रोत्साहन

4) समान महत्त्व

5) दप्तर मुक्त दिन

6) तंत्रज्ञानाचा वापर या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली यानंतर शालेय शिक्षणासाठी मानक निश्चिती आणि अधिस्वीकृती त्याचबरोबर इंटिग्रेटेड पदवी यावरही सखोल मार्गदर्शन केले.

                सन 2030 पर्यंत शिक्षक शिक्षणाचे बदल हळूहळू बहू विद्या शाखीय,महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये केले जाईल. यात शिक्षक शिक्षण सुधारणा करणे, शिक्षक भरती आणि नेमणूक,  सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांवर(SEDGS) विशेष लक्ष, इत्यादी विषयाचे नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणातील बदल लक्षात आणून दिले.  आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील अंमलबजावणीसाठी कालरेषा यातील प्रत्येक बाबींची मुद्देसूद चर्चा केली.

                यानंतर डॉ.भागीरथी  गिरी मॅडम आणि लातूर डायट चे प्राचार्य डॉ. अनिल मुरकुटे सर यांनी या वेबिनार चे आभार व्यक्त करत असताना मोलाचे मार्गदर्शन केले. खरोखरच महाराष्ट्राच्या भूषण असलेल्या डॉ. नेहा बेलसरे मॅडम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून आम्हाला प्रेरित केले आहे.त्याबद्दल डॉ.नेहा बेलसरे मॅडम आणि लातूर, वर्धा आणि बुलढाणा टीम यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक विशेष अभिनंदन आणि आभार.

      अहवाल लेखन

 सहशिक्षिका

 श्रीमती नंदा सोनकांबळे

 जि प प्रा शा मुत्तलगाव

ता. उदगीर जि. लातूर 

Friday, January 1, 2021

सावित्रीबाई फुले - स्त्री शिक्षणाच्या जनक



जगाच्या इतिहासात न मिळणारे स्त्री व्यक्तिमत्व, समाज व्यवस्थेच्या विरुद्ध प्रवाहाने शैक्षणिक कार्य करून जगाच्या इतिहासात स्त्रियांना स्थान मिळवून देणारी थोर माता, स्त्री शिक्षणाच्या प्रथम प्रणेत्या, स्त्री शिक्षणाच्या जनक,भारतातील पहिल्या शिक्षक,मुख्याध्यापिका,महिला समाजसुधारक, मराठीतील पहिल्या कवयित्री, पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत म्हणजेच विश्वभुषण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.

          अज्ञान आणि अंधकाराने ग्रासलेल्या समाजात एक मशाल बनून  3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आई लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी जन्म घेते. वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी 1840 साली झाले. त्यावेळी ज्योतिबा तेरा वर्षांचे होते.

           लहानपणी सावित्रीबाई शिरवळच्या  बाजारात जिलेबी खात उभ्या होत्या,तेव्हा कोणीतरी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना ख्रिश्चन चरित्र भेट दिले.सासरी येताना ते पुस्तक सोबत घेऊन त्या आल्या होत्या.यावरूनच त्यांची शिक्षणाविषयीची जिज्ञासा लक्षात येते पुढे जोतिरावांनी सावित्रीबाईंना रीतसर शिक्षण दिले.

         


             1जानेवारी 1848 रोजी     पुण्यातील भिडे वाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली.सुरवातीला या शाळेत फक्त सहा मुली होत्या. त्यात -

1) अन्नपूर्णा जोशी

2)सुमती मोकाशी 

3) माधवी थत्ते

4) सोनू पवार

5) दुर्गा भागवत

6) जनी कार्डीले यांचा समावेश होता.  वर्षभरात या संख्येत वाढ होऊन 40 ते 50 मुली शिक्षण घेऊ लागल्या. सावित्रीबाईंचे शिक्षण कार्य पाहून 1952 मध्ये इंग्रज सरकारने ब्रिटन अधिकारी मेजर कॅन्डी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्कार करून या दांपत्याला शैक्षणिक कार्यात प्रोत्साहित केले व शाळांना सरकारी अनुदान चालू केले.

             सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू केली, तेव्हा त्यांनी या शाळेत फक्त माळ्याच्याच  मुलींना प्रवेश दिला का? तर अजिबात नाही, त्यात इतर जाती-धर्माच्या (चार ब्राह्मण, एक मराठा, एक धनगर )मुली होत्या.याचे कारण म्हणजे त्या वेळी सर्वच जाती-धर्मातील स्त्रिया या एकूणच गुलाम होत्या.चूल आणि मूल एवढंच त्यांच्या नशिबी होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या मनात कुठलीच भेदभावाची भावना नव्हती. त्यांच्या डोक्यात फक्त मुलींना शिक्षण देणे एवढेच होते.

             नेपोलियनने फार सुंदर वाक्य म्हटलं होतं, " स्त्री शिकली तरच कुटुंब आणि राष्ट्र प्रगत होईल" हे जोतिबा आणि सावित्रीबाईनी जाणलं होतं आणि म्हणूनच सर्व जातीधर्मातील एकूण गुलाम असणाऱ्या  स्त्रियांना सावित्रीबाईंनी शिक्षण रुपी अमृत पाजून अज्ञान आणि अंधकाराच्या साखळदंडातुन बाहेर काढण्याचे पवित्र कार्य हाती घेतले.अशा या महान थोर मातेला कोटी कोटी प्रणाम.या ज्ञानज्योती  थोर आईचे कर्तृत्व आणि तिचा संघर्ष प्रत्येक भारतीय स्त्रीने लक्षात ठेवला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी ही दूरदृष्टी ठेवून जर शिक्षणाचे कार्य हाती घेतले नसते, तर आजच्या स्त्रीमध्ये एवढी प्रगल्भता येण्यासाठी कित्येक शतके वाट पाहावी लागली असती,हे ही आपल्याला विसरून चालणार नाही.

             आजही आपण वटसावित्रीची सावित्री लक्षात ठेवतो. पण ज्ञानज्योती सावित्रीबाईंनी लाखो स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून उच्च पदावर पोहोचवले. या सावित्री ची जयंती आपल्या लक्षात राहत नाही. आज आपल्याला वटसावित्रीची नाही तर शिक्षणाची सावित्री लक्षात ठेवण्याची गरज आहे.कारण सावित्रीबाईंनी ज्या शाळा सुरू केल्या त्यांचा वारसा पुढे चालवत आज स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत. पुराणातल्या सावित्रीने फक्त आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. पण या क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी अठराव्या शतकात मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली करून अज्ञान आणि अंधारातील स्त्रियांना बाहेर काढले. सावित्रीबाईनी त्या काळात जर शिक्षणाचे पवित्र कार्य हाती घेतले नसते,तर आजही आपल्या देशात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रियांना शिक्षण द्यावे का नाही ? या विषयावरच चर्चा झाली असती.

               शैक्षणिक कार्याबरोबरच इतर सामाजिक कार्यातही  त्या अग्रेसर होत्या.  सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्योतीबांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले.1876 -77 साली  पडलेल्या दुष्काळात त्यांनी मोलाचे समाजकार्य केले.1897 साली पुणे येथे प्लेग या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली होती.त्या रोग्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी पुण्याजवळील ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला.आणि प्लेगच्या रोग्यांची सेवा करू लागल्या.हे करत असताना त्या स्वतःच  प्लेगच्या बळी ठरल्या.आणि 10 मार्च 1897 ला पुण्यात शेवटचा श्वास घेतला.  सावित्रीबाईंचे "काव्यफुले" आणि "बावनकशी सुबोध रत्नाकर" हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

              अशा या थोर मातेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन "बालिका दिन "म्हणून साजरा केला जातो.  शिकून भारतातील स्त्रियांना शिक्षित करणाऱ्या सावित्रीबाईंना सलाम.  सावित्रीबाईंचे हे योगदान सदैव स्मरणात ठेवून त्यांच्या कार्यास आजच्या दिनी भारतीय स्त्रियांचा मानाचा मुजरा......मानाचा मुजरा....

      सहशिक्षिका

नंदा सोनकांबळे

जि. प. प्रा. शा. मुत्तलगाव

ता. उदगीर जि. लातूर 

            

Tuesday, December 15, 2020

उदगीर विकासाच्या संदर्भाने




 महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील उदगीर हे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून  प्रसिद्ध  असून शैक्षणिक,सांस्कृतिक,राजकीय आणि सामाजिक वारसा या शहराला लाभला  आहे.

                    आणखी यात महत्वाची भर म्हणजे उदगीर हे कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमा  जोडल्या गेल्या असून लोहमार्गाचे जाळे ही या शहराला अनेक मोठ्या  बाजारपेठेशी जोडते. त्यामुळे देशभरात या शहराचे व्यापार व दळणवळण मोठ्या प्रमाणात होताना दिसते. यामुळे उदगीर शहराची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून एक "इंडस्ट्रियल हब " म्हणूनही या शहराकडे पाहिले जात आहे. याच कारणामुळे भविष्यात उदगीरचे औद्योगिक  क्षेत्र झपाट्याने विकसित होईल. गरज आहे ती फक्त दूरदृष्ठी ठेऊन काम करण्याची. 

              



       उदगीरला लोहमार्गाचे जाळे आहे आणि ते कर्नाटक,आंध्र प्रदेश या प्रदेशाशी जोडलेले आहे. विविध उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, वाहतूक इत्यादी बाबी लोहमार्ग यामुळे शक्य होतील. विशेष म्हणजे त्यामुळे येथील प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. जेणेकरून येथील कामगारांना इतर शहराकडे कामानिमित्त धाव घ्यावी लागणार नाही.प्रत्येक हाताला काम मिळाल्यामुळे उदगीरची आर्थिक स्थिती सुधारण्यास वाव मिळेल.असं म्हटलं जातं "जिथली आर्थिक स्थिती भक्कम असते तिथल्या विकासाला गती येते "आणि म्हणून उदगीरचा आर्थिक विकास करायचा असेल तर लोहमार्ग आणि औद्योगिक क्षेत्रा कडे विशेष लक्ष द्यावे लागेल.




                   उद्योग क्षेत्राचा विकास करत असतानाच आपल्याला शिक्षण क्षेत्राचाही विकास करण्यास वाव आहे. कामाच्या शोधात आई वडील जिकडे जातील तिकडे मुले  जातात. अशा  कामगारांची  प्राथमिक शाळेतील मुले मध्येच शाळा सोडुन न जाता इथेच शिक्षण घेतील, यामुळे मुलांचे स्थलांतर आणि गळतीचे प्रमाण आटोक्यात येईल,विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची व शाळेची गुणवत्ता टिकून राहील आणि मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही म्हणजेच गुणवत्तेच्या पॅटर्नमध्ये भर पडेल यातूनच पुढे उदगीर नगरीत अनेक विचारवंत,साहित्यिक,कलावंत, शास्त्रज्ञ इत्यादी तज्ञ व्यक्ती घडण्यास मदत होईल, जे की  उदगीर विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असेल.

                        पूर्वीपासूनच शिक्षणाची परंपरा असलेले आणि ज्या मधून अनेक तज्ञ व्यक्ती नावारूपाला आलेले" महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय,श्यामलाल मेमोरियल हायस्कूल "व उदगीर मधील सर्व शाळा, महाविद्यालयांची शैक्षणिक प्रगती पाहता आजही उदगीरचा ऊर अभिमानाने भरून येतो.  याला आणखी पुढे घेऊन जायचे असेल तर इथे आपल्याला अनेक शिक्षण तज्ञांची नेमणूक करावी लागेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचा एक नवीन पॅटर्न या उदयगिरीत  उभारावा लागेल, जेणेकरून तज्ञ व्यक्तिमत्त्वाची खाण या पॅटर्न मधून निर्माण होईल.यासाठी आपल्याला शाळांची व शिक्षणाची स्थिती यात सुधारणा करावी लागेल.

                          याहीपुढे जाऊन आपल्याला उदगीरच्या पर्यटन क्षेत्राचाही विकास करता येईल. उदगीर मध्ये असलेला ऐतिहासिक "उदयगिरी किल्ला "उदगीर करांसाठी एक अनमोल ठेवा आहे."उदयगिरी किल्ला एक पर्यटन स्थळ" म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला तर त्यातूनही उदगीरच्या आर्थिक विकासात भर पडेल.  तसेही उदयगिरी किल्ल्याला निजामकालीन वारसा आहे,त्यामुळे देशी आणि विदेशी पर्यटक याकडे आकर्षित होतील आणि उदयगिरी ची उदगीर नगरी देशात तर आहेच पण जगामध्ये  ऐतिहासिक शहर म्हणून गणले जाईल.

                            त्याचप्रमाणे सांस्कृतिक वारसाही उदगीरने जपलेला आहे. उदगीर मध्ये "उदयगिरी सांस्कृतिक महोत्सव "दरवर्षी घेतला जातो, याला जर प्रोत्साहन दिले तर यातूनच उत्तम दर्जाचे कलावंत निर्माण होतील आणि उदगीरला एक नवीन ओळख मिळू शकेल.यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे आहे.उदगीर जिल्हा निर्मिती ची मागणीही प्रस्तावित आहेच याचाही आपल्याला पाठपुरावा करावा लागेल हे जर शक्य झाले तर उदगीर विकासाला गती येईल.


नंदा सोनकांबळे

(सहशिक्षिका)

जि. प. प्रा. शा. मुत्तलगाव 

ता.  उदगीर,  जि.  लातुर 

                       

टीईटी परीक्षा संदर्भाने

           " गुरुविन न मिळे ज्ञान,             ज्ञानाशिवाय न मिळे जगी सन्मान " " जे मुलांना शिकवतात ते शिक्षक असतात  जे मुलां...