महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील उदगीर हे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून शैक्षणिक,सांस्कृतिक,राजकीय आणि सामाजिक वारसा या शहराला लाभला आहे.
आणखी यात महत्वाची भर म्हणजे उदगीर हे कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमा जोडल्या गेल्या असून लोहमार्गाचे जाळे ही या शहराला अनेक मोठ्या बाजारपेठेशी जोडते. त्यामुळे देशभरात या शहराचे व्यापार व दळणवळण मोठ्या प्रमाणात होताना दिसते. यामुळे उदगीर शहराची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून एक "इंडस्ट्रियल हब " म्हणूनही या शहराकडे पाहिले जात आहे. याच कारणामुळे भविष्यात उदगीरचे औद्योगिक क्षेत्र झपाट्याने विकसित होईल. गरज आहे ती फक्त दूरदृष्ठी ठेऊन काम करण्याची.
उदगीरला लोहमार्गाचे जाळे आहे आणि ते कर्नाटक,आंध्र प्रदेश या प्रदेशाशी जोडलेले आहे. विविध उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, वाहतूक इत्यादी बाबी लोहमार्ग यामुळे शक्य होतील. विशेष म्हणजे त्यामुळे येथील प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. जेणेकरून येथील कामगारांना इतर शहराकडे कामानिमित्त धाव घ्यावी लागणार नाही.प्रत्येक हाताला काम मिळाल्यामुळे उदगीरची आर्थिक स्थिती सुधारण्यास वाव मिळेल.असं म्हटलं जातं "जिथली आर्थिक स्थिती भक्कम असते तिथल्या विकासाला गती येते "आणि म्हणून उदगीरचा आर्थिक विकास करायचा असेल तर लोहमार्ग आणि औद्योगिक क्षेत्रा कडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
उद्योग क्षेत्राचा विकास करत असतानाच आपल्याला शिक्षण क्षेत्राचाही विकास करण्यास वाव आहे. कामाच्या शोधात आई वडील जिकडे जातील तिकडे मुले जातात. अशा कामगारांची प्राथमिक शाळेतील मुले मध्येच शाळा सोडुन न जाता इथेच शिक्षण घेतील, यामुळे मुलांचे स्थलांतर आणि गळतीचे प्रमाण आटोक्यात येईल,विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची व शाळेची गुणवत्ता टिकून राहील आणि मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही म्हणजेच गुणवत्तेच्या पॅटर्नमध्ये भर पडेल यातूनच पुढे उदगीर नगरीत अनेक विचारवंत,साहित्यिक,कलावंत, शास्त्रज्ञ इत्यादी तज्ञ व्यक्ती घडण्यास मदत होईल, जे की उदगीर विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असेल.
पूर्वीपासूनच शिक्षणाची परंपरा असलेले आणि ज्या मधून अनेक तज्ञ व्यक्ती नावारूपाला आलेले" महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय,श्यामलाल मेमोरियल हायस्कूल "व उदगीर मधील सर्व शाळा, महाविद्यालयांची शैक्षणिक प्रगती पाहता आजही उदगीरचा ऊर अभिमानाने भरून येतो. याला आणखी पुढे घेऊन जायचे असेल तर इथे आपल्याला अनेक शिक्षण तज्ञांची नेमणूक करावी लागेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचा एक नवीन पॅटर्न या उदयगिरीत उभारावा लागेल, जेणेकरून तज्ञ व्यक्तिमत्त्वाची खाण या पॅटर्न मधून निर्माण होईल.यासाठी आपल्याला शाळांची व शिक्षणाची स्थिती यात सुधारणा करावी लागेल.
याहीपुढे जाऊन आपल्याला उदगीरच्या पर्यटन क्षेत्राचाही विकास करता येईल. उदगीर मध्ये असलेला ऐतिहासिक "उदयगिरी किल्ला "उदगीर करांसाठी एक अनमोल ठेवा आहे."उदयगिरी किल्ला एक पर्यटन स्थळ" म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला तर त्यातूनही उदगीरच्या आर्थिक विकासात भर पडेल. तसेही उदयगिरी किल्ल्याला निजामकालीन वारसा आहे,त्यामुळे देशी आणि विदेशी पर्यटक याकडे आकर्षित होतील आणि उदयगिरी ची उदगीर नगरी देशात तर आहेच पण जगामध्ये ऐतिहासिक शहर म्हणून गणले जाईल.
त्याचप्रमाणे सांस्कृतिक वारसाही उदगीरने जपलेला आहे. उदगीर मध्ये "उदयगिरी सांस्कृतिक महोत्सव "दरवर्षी घेतला जातो, याला जर प्रोत्साहन दिले तर यातूनच उत्तम दर्जाचे कलावंत निर्माण होतील आणि उदगीरला एक नवीन ओळख मिळू शकेल.यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे आहे.उदगीर जिल्हा निर्मिती ची मागणीही प्रस्तावित आहेच याचाही आपल्याला पाठपुरावा करावा लागेल हे जर शक्य झाले तर उदगीर विकासाला गती येईल.
नंदा सोनकांबळे
(सहशिक्षिका)
जि. प. प्रा. शा. मुत्तलगाव
ता. उदगीर, जि. लातुर



No comments:
Post a Comment