शिक्षणाचे आग्रही, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, " स्त्रियांचे शिक्षण "हे ब्रीद घेऊन समाजाच्या विरुद्ध प्रवाहाने ध्येय गाठणारे, अठराव्या शतकात स्त्रियांना आणि दीनदलितांना शिक्षणाचा आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून कार्य करणारे आणि जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक गुरु म्हणून ओळखले जाणारे ज्ञानज्योती, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारातच आपल्याला असे दिसून येते की, पुरूषांच्या बरोबरीने स्त्री आल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही जसे नाण्याची एक बाजू कोरी असेल तर ते नाणं उपयोगात येत नाही, गाडीच्या दोन चाका पैकी एक चाक मोडून पडला तर गाडी पुढे जात नाही. त्याप्रमाणे स्त्री-पुरुष हे जीवनाचे दोन्ही अंग सक्षम असली पाहिजेत आणि त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. म्हणजेच पुरुषाच्या बरोबरीने स्त्री सुद्धा प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभागी झाली पाहिजे. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सर्वच लेखनामध्ये आपल्याला स्त्री-पुरुष अशीच मांडणी दिसून येते.
प्रवाहात तर काहीही वाहून जाते,पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहून समाजाला अज्ञानाच्या अंधकारात तून आणि गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षण रुपी अमृत पाजून सक्षम बनविले. आपण समाजाला अज्ञानाच्या अंधकारा तून बाहेर काढण्याचा विचार सोडून द्या हो, फक्त आपल्या कुटुंबाला जरी अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढलं तर आपल्यावर गुलामगिरी राज्य करू शकणार नाही.
आज प्रत्येक घरातील पुरुष कोणत्या ना कोणत्या नोकरीला आहेत. जेव्हा ते कार्यक्रमात बोलत असतात ,तेव्हा ते बोलताना ज्ञानज्योती, क्रांतीसुर्य, समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना त्रिवार अभिवादन असे मोठ्या उत्साहाने म्हणतात, पण हाच उत्साह घरात वावरताना ठेवला तर काय बिघडेल? आत्ताची पिढी सुशिक्षित म्हणण्यापेक्षा प्रगत आहे. ती आपल्या मुलांना हवे तसे संस्कार व शिक्षण देऊ शकते. जर प्रत्येक वडील मुलीच्या पाठीशी शिक्षण देण्यासाठी, प्रत्येक नवरा पत्नीच्या पाठीशी शिक्षणाची सावित्री बनवण्यासाठी, प्रत्येक भाऊ बहिणी सोबत जर खंबीरपणे उभे राहिले तर प्रत्येक मुलगी, पत्नी, बहिण स्वावलंबी आणि सक्षम बनेल. जेव्हा मुलगी काही करू इच्छिते तेव्हा वडील तिचे लग्न लावून देतात आणि मग पुढे मुलीच्या वाट्याला जे येते ते खूपच असहय करणारे असते.म्हणून प्रत्येक पित्याने आपल्या मुलीला ती स्वावलंबी होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. तरच आजच्या या महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिनी तुम्ही केलेल्या त्रिवार अभिवादनाचे खरे सुख मिळेल.
ज्यांनी पुरुषांसाठी वेगळे नियम आणि स्त्रियांसाठी वेगळे नियम लावून दिले या नियमामुळे खरेतर भेदभावाची भावना कुटुंबातूनच उदयास आली.म्हणून या नियमांना महात्मा ज्योतिबा फुले यांचा तीव्र विरोध होता. आताही आपण मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करतो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारात आपल्याला असे दिसून येते की, सर्व प्राण्यांमध्ये पुरुष श्रेष्ठ आहे तसेच सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. हेही आपल्याला विसरून चालणार नाही.
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत जेव्हा मुलींची पहिली परीक्षा झाली त्या वेळचे हे उदाहरण - फुले दांपत्याच्या शाळेत जेव्हा मुलींची पहिली परीक्षा झाली, तेव्हा ती परीक्षा पाहण्यासाठी तिथे तीन हजारापेक्षा जास्त लोक जमले होते. मुलींची परीक्षा म्हटलं की जास्त कुतूहल वाटतं का हो? बरे असो. त्या परीक्षेत एक मुलगी पहिली आली. तिला कलेक्टर च्या पत्नीच्या हस्ते एक बक्षीस देण्यात आलं. तेव्हा त्या मुलीने प्रश्न विचारला की,तुम्ही मला यात काय बक्षीस दिलं आहे. तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या, तू लहान आहेस तुला खेळणी आणि खाऊ आवडतो म्हणून आम्ही तुला यात खेळणी आणि खाऊ दिला आहे. तेव्हा त्या मुलीने दिलेलं उत्तर असं होतं मला खाऊ आणि खेळणी नको मला माझ्या शाळेत ग्रंथालय पाहिजे. म्हणजेच शिक्षण आपल्याला किती सक्षम बनवतं याचंच हे उत्तम उदाहरण.
आणखी एक उदाहरण मी आपल्या समोर ठेवू इच्छिते. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींचे . ती विद्यार्थिनी आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी " स्त्री पुरुष तुलना " हा मराठी ग्रंथ 1885 मध्ये लिहिला, तो जगातला सर्वात पहिला स्त्री हक्क व स्त्रीवाद यावर चा ग्रंथ मानला जातो. त्याच बरोबर 1906 साली तानुबाई बिर्जे नावाची विद्यार्थिनी भारतातील पहिली महिला संपादिका झाली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणारी विद्यार्थिनी सावित्रीबाई रोडे ही 1915 साली पहिली महिला सरचिटणीस झाली. हे सगळं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्यामुळे शक्य झालं म्हणून स्त्रियांसाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी आहेत.
स्त्रियांना शिक्षण रुपी अमृत पाजून, स्त्रियांच्या जीवनात अनंत पैलू आणणारे महान क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्व महिलांच्या वतीने कोटी कोटी अभिवादन.
सहशिक्षिका
श्रीमती सोनकांबळे नंदा निवृत्ती
जि प प्रा शा मुत्तलगाव
ता. उदगीर जि. लातूर



No comments:
Post a Comment