Thursday, November 5, 2020

बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षणाचा अहवाल




 कोविड-19 मुळे बंद झालेल्या शाळा आणि ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात आलेले मोबाईल व त्याचा मुलांच्या व पालकांच्या निर्माण होणाऱ्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यात मुलांना व पालकांना सावध करण्याची भूमिका घेऊन शिक्षकांच्या मदतीनेSCERT ने एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. याचाच एक भाग म्हणून प्राचार्य, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, शिक्षक, पालक इत्यादींना बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावर प्रशिक्षण देऊन सजग करण्याचे मोठे कार्यSCERT ने केले आहे, हे करत असताना काही महत्वाचे उद्देश हीSCERT ने समोर ठेवले आहेत. यात प्रामुख्याने परिषदेने बालकांचा विचार केला आहे. वर्तमान काळामध्ये बालकांना शारीरिक,  मानसिक, बौद्धिक, भावनिक संरक्षण देणे हे अत्यंत गरजेचे आहे, हे संरक्षण देत असताना त्या संदर्भातील कायदे,  नियम याचीही कल्पना मानवी घटक सर्वांना असणे आवश्यक आहे. त्यामुळेच समाजातील जबाबदार घटक यासंदर्भात परिचय व्हावा व बालकांना त्याचे हक्क व सुरक्षित वातावरण मिळावे या दृष्टीकोनातून ही भूमिका समजून घेणे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच परिषदेने अत्यंत मेहनतीने तज्ञ लोकांचे तीनदिवसीय( 20/21/22 ऑक्टोबर 2020) प्रशिक्षण आयोजित केले होते. यात जवळपास एक लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थ्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदवला.    

                    या प्रशिक्षणाची विभागणी तीन दिवसात  एकूण  दहा  सत्रात करून तेरा तज्ञ मार्गदर्शकांनी या लाखो प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. पहिल्या सत्रात प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रास्ताविक करून प्रशिक्षणाचा उद्देश, हेतू,  फायदे अशा विविध बाबीवर चर्चा केली. आणि विशेष म्हणजे प्रशिक्षण संपेपर्यंत त्यांचे लक्ष  प्रशिक्षणार्थ्यां वर होते. प्रशिक्षण चालू असताना मध्ये मध्ये त्या जॉईन होण्याची सूचना देत होत्या. तर उद्घाटक म्हणून परिषदेचे संचालक माननीय दिनकर पाटील यांनी या प्रशिक्षणाचे महत्त्व थोडक्यात विशद करून प्रशिक्षणाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

               तिसऱ्या सत्रात श्रीमती रत्नप्रभा भालेराव यांनी बालकांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी खालील महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला.

1. बालकांचे हक्क

2. बाल हक्क संहितेचे स्वरूप

 3. बालकांचे प्रमुख हक्क   

 4. बाल हक्क व भारत      

 5. हक्काबाबत अधिक संवेदनशीलतेची गरज का आहे      

 6. प्रशिक्षणातून आपणास काय समजेल या बाबीवर प्रकाश टाकला.       

                   चौथ्या सत्रात युनिसेफचे श्री. विकास सावंत यांनी " बालकांचे हक्क व सुरक्षितता संबंधात असलेले कायदे" या विषयावर भाष्य केले. यात प्रामुख्याने

             1. बाल न्याय मुलांची( काळजी व संरक्षण) कायदा 2015    

             2. बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण कायदा 2012       

             3. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956

              4. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006

               5. बालकामगार( प्रतिबंध व नियमन) सुधारित कायदा 2016

               6. माहिती व तंत्रज्ञान सुधारित कायदा 2008 अशा विविध कायद्यावर व त्यातील कलमावर व उप कलमावरत्यांनी सविस्तर चर्चा केली.

            पाचव्या सत्रात अर्पण च्या श्रीमती सोनाली परब व शुभांगी मॅम यांनी" बालकांचे शोषण व परिणाम" यावर सखोल माहिती दिली. यात त्यांनी

1. संरक्षणाचा अधिकार

2. बाल शोषण- शारीरिक, भावनिक, दुर्लक्ष, लैंगिक अत्याचार इत्यादी

3. बाल लैंगिक शोषण काय आहे

4. लैंगिक शोषणाचे प्रकार

5. बाल शोषण होण्याची अधिक शक्यता असलेली मुले

6. ग्रूमिंग इत्यादी आणि याचे मुलावर ताबडतोब होणारे परिणाम- भीती, गोंधळणे, संताप, लज्जा, अपराधीपणा, धक्का बसणे, दुःख इत्यादी गोष्टींना मुलांना सामोरे जावे लागते. आणि त्याच बरोबर - 

1. लैंगिक शोषणाची लक्षात येण्यासारखी काही लक्षणे

2. लैंगिक शोषणावर ची आकडेवारी

3. प्रतिबंधात्मक उपाय याची अंमलबजावणी प्रक्रिया काय आहे

4. मुलांना सुरक्षित ठेवणे

5. आत्मसन्मान देणे

6. वयानुसार योग्य संदेश देणे

7 अतिरिक्त संसाधने

8. प्रौढांसाठी अतिरिक्त संसाधने इत्यादी बाबी लक्षात आणून दिल्या, यात शिक्षकांची भूमिका काय आहे, आणि" संस्थात्मक प्रोटोकॉलची" आपल्याला कशा प्रकारे मदत होते, हे ही अतिशय सोप्या शब्दात पटवून दिले.

  सहाव्या सत्रात online safety च्या पहिल्या सत्रात श्री अभिनव भोसले यांनी मोबाईल आणि संगणकासाठी काय सुरक्षितताबाळगली पाहिजे यावर सविस्तर माहिती दिली. यात त्यांनी मोबाईल सुरक्षेचे तोटे व उपाय सांगितले

 तोटे:

1. माहितीची चोरी

2. आर्थिक नुकसान

3. आपल्या मोबाईल वरुन संदेश आणि कॉल

4. मोबाईल वरील नियंत्रण गमावणे

5. मानसिक त्रास

6. मोबाईल हरवणे किंवा चोरी झाल्यास

7. मोबाईल कनेक्टिव्हिटी ची सुरक्षा व धोके

8. फिशिंग इमेल्स

9. मोबाईल ॲप्लिकेशन

 उपाय:

1. नेहमी आपल्या मोबाईलची सिस्टीम अपडेट ठेवणे

2. ऍप्लिकेशन्स नेहमी अपडेट ठेवणे

3. ॲप कोड सिक्युरिटी

4. आपल्या मोबाईलच्या सेटिंग मधील डेव्हलपर मोड हा ऑफ ठेवणे

5. डाटा सिक्युरिटी इत्यादी

 यानंतर

 संगणक सुरक्षा व पेन ड्राइव्ह सुरक्षा:

 यावर बोलत असताना अनधिकृत ऑपरेटिंग सिस्टिम मुळे व वेगवेगळे इन पुट संगणकाला जोडल्यामुळे संगणकाचा धोका वाढतो याची सविस्तर चर्चा करून त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती दिली. यात

1. संगणकाला पासवर्ड वापरणे

2. पेड  ऑपरेटिंग सिस्टिम

3. फायरवॉल ऑन ठेवणे

4. अँटिव्हायरस चा वापर करणे, अशा विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. त्याच बरोबर

1. संगणकातील फाईल कशा सुरक्षित ठेवाव्यात

2. डिव्हाईस ची चोरी कशी थांबवावी, याची माहिती देऊन या सत्राचा समारोप केला.

                   Online safety च्या दुसऱ्या सत्रात श्री कृष्ण निहाल यांनी  मुल, इंटरनेट व सायबर सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन केले. विषयाची सुरुवात करत असताना त्यांनी काही बेसिक प्रश्न सुरूवातीलाच उपस्थित केले.

1. आपल्या पाल्याच्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन परिचित आहेत का? 

2. तो वेबसाईटला भेट देतो, 

3. त्याचे सोशल मीडियावर चे आपले मित्र परिचित आहेत का? 

4. मोबाईल, संगणक वापरल्यावर आपले मुलतणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त दिसते का?  असे प्रश्न उपस्थित करून इंटरनेट वापरात एवढी सुरक्षितता का निर्माण झाली आहे याची कारणे त्यांनी विशद केली.

1. भारतआणि जगात इंटरनेटच्या बाबतीत विविध सर्वे चाआढावा घेऊन त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी विशद केले.

2. मुल सोशल मीडिया वापरताना, कुठले प्रोजेक्ट करत असताना विविध वेबसाइटचा वापर करते,  तेव्हा प्रायव्हसी चे प्रॉब्लेम निर्माण होतात अशावेळी कोणत्या सेटिंग करणे आवश्यक आहे आणि जर त्या केल्या नाहीत तर त्याचे परिणाम काय होतात व आपल्याला कसे फसवले जाते याची चर्चा त्यांनी केली व सायबर सिक्युरिटी च्या बाबतीत काय करणे आवश्यक आहे याची माहिती त्यांनी दिली.

 सातव्या सत्रात बालकांची सुरक्षितता या संदर्भात मानवी घटकांची भूमिका- 

 श्रीमती रत्नप्रभा भालेराव, डॉ. महेश कळलावे आणि डॉ. अरुण जाधव यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यात महेश कळलावे यांनी या विषयावर मार्गदर्शन करत असताना मुलाचे सामाजीकरण होत असताना ज्या संस्था जबाबदार असतात त्या तेरा संस्थांचा थोडक्यात परिचय करून दिला तसेच सुरक्षिततेच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय मानके आहेत याची चर्चा करून शिक्षकांची भूमिका व कार्य यावर ही चर्चा केली तसेच बाल हक्क संरक्षण आयोग यांचीही थोडक्यात माहिती करून दिली

 यानंतर श्रीमती रत्नप्रभा भालेराव यांनी याच विषयाच्या अनुषंगाने भाष्य करत असताना मुख्याध्यापकांची भूमिका काय असावी आणि शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती च्या संदर्भातील जीआर व त्यांच्या भूमिका काय असतात व आपण त्यांच्याशी काय चर्चा करायला हवी याचीही चर्चा केली.

 डॉ.अरुण जाधव यांनी याच विषयाला पुढे घेऊन जात असताना 2009च्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम विशद करून पालकांची भूमिका काय असावी याची चर्चा केली.


 प्रशिक्षणाच्या आठव्या सत्रात" शालेय वातावरण व बालकांची सुरक्षितता "या विषयावर बोलत असताना श्री अजय कुमार फुंदे यांनी पहिल्या सत्रात या विषयाची

1. व्याप्ती

2. उद्दिष्टे

3. प्रास्ताविक

4. शालेय वातावरण व बालक सुरक्षितता: संकल्पना

5. शाळा सुरक्षितता का महत्त्वाची आहे

6. शालेय भौतिक सुविधा व सुरक्षितता

7. विद्यार्थी वाहतूक व सुरक्षितता

8. परिवहन समिती भूमिका व जबाबदारी इत्यादी मुद्द्यावर संवाद साधला.

                    या विषयाची चर्चा करत असताना त्यांनी देशाची सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती समोर ठेवून समाजासमोरील  नवनवीन आव्हाने व त्याला सक्षमपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य व्यक्तीच्या अंगी कसे निर्माण होते याची चर्चा केली. याच बरोबर - शिक्षण म्हणजे" वर्तनातील विकास शील परिवर्तन" अशी व्याख्या करत काही गोष्टींची व घटनांची आठवण करून दिली.

 मुल  ही राष्ट्राची संपत्ती आहे. घर ते शाळा व शाळा ते घर या प्रवासात मुल सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी पालक शिक्षक व मुख्याध्यापकांच्या जबाबदारीची जाणीवही करून दिली. त्यासाठी शालेय भौतिक सुविधा म्हणजेच - इमारत, प्रवेशद्वार,  जिने, लिफ्ट, पाण्याची टाकी,  छत, स्वच्छतागृहे, सभागृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय,  स्वयंपाक गृहे, संरक्षक भिंत, परसबाग, क्रीडा साहित्य,  वास्तू किंवा वस्तू या सुरक्षित ठेवण्याची आणि काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येक मानवी घटकाची आहे हेही जाणीवपूर्वक लक्षात आणून देत school  safety  विषयी माहिती दिली.

                याच बरोबर- विद्यार्थी वाहतूक करत असताना परिवहन समितीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या मार्गदर्शक सूचनाही शाळांनी अमलात आणाव्यात असे सांगितले.

                        यातील दुसऱ्या सत्रात याच विषयावर बोलत असताना डॉ. राजेश बनकर यांनी-

1. सहशालेय उपक्रम व बालक सुरक्षितता

2. शालेय वातावरण बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? 

3. यासाठी शाळा स्तरावरील कृती कार्यक्रम काय असावा  या बाबींची चर्चा केली आणि सुरक्षित शालेय वातावरणासाठी पुढील उपाय योजना सांगितल्या.

1. शालेय परिसरात आवश्यक त्या सूचना योग्य ठिकाणी व स्पष्ट ठिकाणी लिहिलेल्या असाव्यात

2. 5 मे 2017 च्या शासन परिपत्रकानुसार तक्रार पेटी उपक्रमाची कार्यवाही करावी

3. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याचे पूर्व प्रशिक्षण दिले जावे

4. विविध सप्ताह साजरे करावेत

5. आपत्ती व्यवस्थापन संदर्भात पालकांचे उद्बोधन

6. शालेय पोषण आहार असुरक्षितता

7. विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण

8. तज्ञ व्यक्तीकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

9. आवश्यक फोन नंबर दर्शनी भागात प्रदर्शित करणे

10. मानवी घटकांमधील सहसंबंध सलोख्याचे असावेत इत्यादी मुद्द्यावर चर्चा केली.

                  नवव्या सत्रात " समाज माध्यमे व बालकांची सुरक्षितता" या विषयावर चर्चा करण्यासाठी रेस्पोंसिबल नेटिझमचे  श्री. उन्मेष  जोशी यांनी सोशल मीडिया आणि इंटरनेट याविषयी गेली दहा वर्ष "समाज माध्यम संस्था "मुले आणि पालक यांना जागृत करण्याचे आणि SCERT सोबत दोन-तीन वर्षापासून ही संस्था काम करते असे सांगितले. पुढे सांगत असताना ते म्हणाले की मोबाईलचा वापर फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. त्यात

1. हॅकिंग

2. ऑनलाइन जुगार

3. सायबर बुलिंग 

4. आर्थिक गुन्हे आणि सायबर दहशतवाद याविषयी बोलत असतानाच अति हिंसक गेम्स खेळण्याचे परिणाम मुलावर काय होतात याची ही महत्त्वपूर्ण चर्चा त्यांनी केली आणि सोशल मीडिया वापरण्याचे योग्य वय समजून घेणे गरजेचे आहे याचीही आठवण करून दिली. त्याच बरोबर इंटरनेट वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले त्यात- 

1.safe book

2. इंस्टाग्राम सुरक्षितरीत्या वापरणे

3. स्नॅपचॅट सुरक्षितरित्या वापरणे

4.whatsapp. इत्यादी वापरताना इंटरनेटवरील बालकांची सुरक्षितता हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे आणि प्रत्येक पालकांची जबाबदारी असे सांगून "सक्रिय डिजिटल पालक " व्हा. असेही त्यांनी आपल्या चर्चेत नमूद केले. यानंतर शेवटचे म्हणजेच - 

       दहाव्या सत्रात या प्रशिक्षणाचा समारोप झाला. यात डॉ. मेंढे करांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांचे आभार मानून असे प्रशिक्षण पहिल्यांदाच झाले आहे. Covid-19 मुळे ही संधी सर्वांनाच उपलब्ध करून दिली आहे असेही भाष्य त्यांनी आभार व्यक्त करत असताना केले. खरोखरच खूप सखोल अशी माहिती या प्रशिक्षणातून SCERT ने सर्वांनाच उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्व टीमचे मनस्वी धन्यवाद.


अहवाल लेखन

नंदा सोनकांबळे

(सहशिक्षिका)

जि. प. प्रा. शा. मुत्तलगाव 

ता.  उदगीर,  जि.  लातुर 

No comments:

Post a Comment

टीईटी परीक्षा संदर्भाने

           " गुरुविन न मिळे ज्ञान,             ज्ञानाशिवाय न मिळे जगी सन्मान " " जे मुलांना शिकवतात ते शिक्षक असतात  जे मुलां...